माणसातील जुने वटवृक्ष घेणार नवीन रोपांची काळजी

पालिकेने लागवड केलेल्या रोपांची काळजी घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचा पुढाकार
पिंपरी l प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरात ठिकठिकाणी नवीन रोपांची लागवड केली जाते. मात्र अनेक रोपे काळजी न घेतल्यामुळे मृत पावतात. लागवड केलेल्या रोपांची आज व्यवस्थित काळजी घेतली तर ती उद्याच्या मानवी पिढीसाठी मोठी गुंतवणूक ठरणार आहे. त्यामुळे पालिकेकडून लागवड करण्यात येणा-या रोपांची काळजी घेण्यासाठी माणसातील वटवृक्ष म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले आहे. शहरातील नवीन लागवड केलेल्या रोपांची जबाबदारी आता जेष्ठ नागरिकांनी उचलली आहे. उद्याच्या पिढीसाठी जेष्ठ नागरिकामधील वटवृक्ष सरसावला आहे. लवकरच उन्हाळा येतोय, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी लहानग्या रोपांना पाणी घालण्याचे आव्हान स्वीकारले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका, अंघोळीची गोळी आणि खिळेमुक्त झाडं टीम तसेच शहरातील सर्व सामाजिक संस्था यात सहकार्य करत आहेत.
प्रधिकरणमधील संभाजी चौकात नवीन लावलेल्या झाडांभोवती प्लास्टिक बाटल्या बांधल्याआहेत. यावेळी 75 रोपांना पाण्याच्या बाटल्या लावण्यात आल्या आहेत. त्यात जेष्ठ नागरिक रोज पाणी घालणार आहेत. त्यांनी आवाहन केले आहे की, कामाला जाणारे नागरिक, कॉलेजमध्ये जाणारे तरुण-तरुणी यांनी रस्त्याने जाता येता या रिकाम्या बाटल्यात पाणी ओतावे.
यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी वृषाली मरळ, अरुण बागडे, सूर्यकांत मुथीयान, राजीव भावसार, ननावरे, संदीप सपकाळ, सिकंदर घोडके तसेच वृक्ष प्राधिकरणाचे हिरामण भुजबळ उपस्थित होते. महापालिकेचे उपयुक्त सुभाष इंगळे यांनी जेष्ठ नागरिकांना सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. अंघोळीची गोळीचे समन्वयक राहुल धनवे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.