खिळेमुक्त झाडं करण्यासाठी आजी, काकू आणि ताई उतरल्या रस्त्यावर दत्ता बहिरट मित्रपरिवार, नवचैतन्य हास्य परिवार उपक्रमात सहभागी…
अंघोळीची गोळी संस्थेच्या माध्यमाने सातत्याने पर्यावरणपुरक उपक्रम राबविण्यात येत असतात. याच टीमने बहिरटवाडी उद्यान, शिवाजी हाऊसिंग सोसायटी परिसरातील झाडांवरील खिळे, बॅनर, पोस्टर काढण्याचा सुत्य उपक्रम पार पाडला. झाडांनाही संवेदना असतात, तेही सजीव आहेत या उपक्रमाच्या माध्यमाने त्यांच्या वेदना कमी करण्याचा या युवकांनी प्रयत्न केला. खिळेमुक्त झाड आणि आळेयुक्त झाड हा उपक्रम महाराष्ट्रभर विविध भागात राबविला जात आहे. वृक्ष संवर्धन हेच हवामान बदलास उत्तर आहे त्यामुळे खिळेमुक्त झाडं हा उपक्रम सर्वांनी आपल्या शहरांत राबवावा असे आवाहन अंघोळीची गोळी संस्थेचे सदस्य अमित निखार यांनी यावेळी केले. माधव पाटील या तरूणाने सुरु केलेली खिळेमुक्त झाडं मोहीम विस्तारण्यासाठी अनेक युवक प्रयत्न करत आहे आणि पर्यावरण संवर्धनाच्या या चळवळीत अनेक सामाजिक संस्थांची मदत या युवकांना मिळत आहे. या मोहिमेत युवकांनी प्रामुख्याने झाडांना खिळेमुक्त, पोस्टरमुक्त, बॅनरमुक्त करण्याचा प्रयत्न केला. पर्यावरण संरक्षण अधिनियम, महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम आणि राष्ट्रीय ग्रीन ट्रिब्युनल यांत झाडांसंदर्भात अनेक कायदे आणि नियम स्पष्टपणे अधोरेखित असले तरी आपल्याकडे ते पाळले जात नाही त्यामुळे हे नियम अधिक प्रभावी कसे होतील यांसाठी आमचा प्रयत्न चालु आहे. या उपक्रमात पुणे आणि पिंपरी चिंचवड महानरपालिकेच्या उद्यान विभागाने आणि कमिन्स इंडिया फाउंडेशनने देखील आपले योगदान देत आहे. वृक्ष संवर्धनासाठी महानगरपालिकेच्या आणि संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पर्यावरण विषयक कायद्याची तोंडओळख आजच्या उपक्रमाच्या माध्यमातून उपस्थित सर्वांना करून दिली. त्यानंतर उपस्तिथ काकू आणि आजी यांनी हिरहिरीने झाडांचे खिळे आणि पोस्टर्स काढले.यात रत्नमाला सरोदे
जयश्री नवाथे,लीला भागवत, सुजाता साळुंखे आघाडीवर होत्या. उपक्रमात संस्थेचे कार्यकर्ते तेजश्री पाटील, अनुराधा ठाकुर, युवराज कलकुटगी उपस्थित होते त्याचरोबर दत्ता बहिरट परिवारचे बाबा सय्यद व नवचैतन्य परिवारचे विजय भोसले आणि महिलावर्ग उपस्थित होता. पर्यावरण संवर्धनासाठी खिळेमुक्त झाडे मोहीम महाराष्ट्रभर व्यापक करण्याचा म्हणजेच हवामान बदलाचा सामना करण्यासाठी हवामान ठोसा देण्याचा म्हणजेच पर्यावरण संवर्धनासाठी शक्य ती कृती करण्याचा संकल्प या कार्यकर्त्यांनी यावेळी केला.